पालोद प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा उघड

Foto
शासकीय औषधांचा बेजबाबदार निपटारा, कारवाईची मागणी

सिल्लोड, (प्रतिनिधी) तालुक्यातील पालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान संबंधित कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याच वेळी केंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली शासकीय औषधे बेवारस अवस्थेत फेकून दिलेली असल्याचे निदर्शनास आले. 

ही सर्व औषधे शासनामार्फत नागरिकांच्या उपचारासाठी पुरविण्यात आलेली असल्याने, त्यांचा असा बेजबाबदार व नियमबाह्य निपटारा करणे म्हणजे थेट शासकीय मालमत्तेची नासाडी तसेच नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केल्यासारखे आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ तसेच, १९४० मधील तरतुर्दीचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.

फेकून दिलेल्या औषधांमुळे परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून, याचा थेट फटका स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात आधीच मर्यादित आरोग्य सुविधा असताना, प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या महत्त्वाच्या संस्थेत असा प्रकार घडणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकरणासंदर्भात संबंधित तक्रारदाराने घटनास्थळाचे फोटो, व्हिडिओ व लोकेशनसह ठोस पुरावे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. 

सदर प्रकारासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व जबाबदार कर्मचारी दोषी असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषध साठा, कर्मचारी उपस्थिती आणि जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.